'जरा विसावू या वळणावर....'
'आज खूपच सुंदर दिसतेय ही !' काॅफीची आॅर्डर द्यायला गेलेल्या प्राचीकडे अनुराग बघत होता. CCDला गेल्यावर काॅफीची आॅर्डर तर तिनेच द्यायची हे अगदी ठरून गेलेलं ! 'हल्लीच लागलाय हिला चश्मा, तो घालून तर भलतीच जास्त गोड दिसायला लागली आहे आजकाल. तसं तर रोज भेटते, भरपूर गप्पा मारते. बरोबर असते तेव्हा वेळ कसा छान जातो. वाटतं नुसतं हिच्या बरोबर असावं, बघत रहावं. गप्पा अशाच रंगत जाव्यात, सोबत ओठांवर नि जिभेवर CCDच्या Latteची चव रेंगाळत रहावी आणि मनात त्या क्षणांच्या आठवणी.... काॅफी संपली म्हणून नाइलाजाने गप्पा आवरत्या घ्याव्यात. बाॅस, काम, क्रश, थोडंबहुत मन मोकळं व्हावं, दिवसभराचा ताण हलका व्हावा. मग बाइकवर तिला मागे बसवून स्टॉपपर्यंत सोडावं. आयुष्याने दिलेल्या अशा चारदेन सुखाच्या क्षणांत समाधान मानावं नि तसंच हवेत तरंगत परत यावं... परीकथा वाटते ना ? पण नाही, ही सत्यकथा आहे. प्रत्येक स्टोरीचा शेवट 'and they lived happily ever after...' असा होत नाही. पण प्रत्येक स्टोरी 'आणि एकमेकांना आयुष्यात पुन्हा कधीही न भेटण्यासाठी त्यांनी एकमेकांचा शेवटचा निरोप घेतला' अशीही संपण्याची...