'जरा विसावू या वळणावर....'
'आज खूपच सुंदर दिसतेय ही !' काॅफीची आॅर्डर द्यायला गेलेल्या प्राचीकडे अनुराग बघत होता. CCDला गेल्यावर काॅफीची आॅर्डर तर तिनेच द्यायची हे अगदी ठरून गेलेलं ! 'हल्लीच लागलाय हिला चश्मा, तो घालून तर भलतीच जास्त गोड दिसायला लागली आहे आजकाल. तसं तर रोज भेटते, भरपूर गप्पा मारते. बरोबर असते तेव्हा वेळ कसा छान जातो. वाटतं नुसतं हिच्या बरोबर असावं, बघत रहावं. गप्पा अशाच रंगत जाव्यात, सोबत ओठांवर नि जिभेवर CCDच्या Latteची चव रेंगाळत रहावी आणि मनात त्या क्षणांच्या आठवणी.... काॅफी संपली म्हणून नाइलाजाने गप्पा आवरत्या घ्याव्यात. बाॅस, काम, क्रश, थोडंबहुत मन मोकळं व्हावं, दिवसभराचा ताण हलका व्हावा. मग बाइकवर तिला मागे बसवून स्टॉपपर्यंत सोडावं. आयुष्याने दिलेल्या अशा चारदेन सुखाच्या क्षणांत समाधान मानावं नि तसंच हवेत तरंगत परत यावं... परीकथा वाटते ना ? पण नाही, ही सत्यकथा आहे. प्रत्येक स्टोरीचा शेवट 'and they lived happily ever after...' असा होत नाही. पण प्रत्येक स्टोरी 'आणि एकमेकांना आयुष्यात पुन्हा कधीही न भेटण्यासाठी त्यांनी एकमेकांचा शेवटचा निरोप घेतला' अशीही संपण्याची आवश्यकता नाही. काही कथा याहून वेगळा मार्ग शोधतात. प्रत्येक गोष्ट ही 'लव्हस्टोरी'च का असावी ? एखादं अनामिक, अव्यक्त नातं. कदाचित माझं एकट्याचंच असेल ते. पण प्रेमाव्यतिरिक्त एक फक्त आत्मानंदाची, स्वसुखाची भावना, त्या भावनेची माझी कथा आहे ही. जशी झुळूक येते, क्षणभर रेंगाळते, आपल्याला सुखावते आणि पुढल्या प्रवासाला निघून जाते. आपण त्या झुळकेवर प्रेम करत नाही. तिच्याप्रमाणेच आपणही काही आपली मार्गक्रमणा थांबवत नाही, पुढे चालत राहतो. काही काळाने ती झुळूक कुठे असेल माहीत नसतं पण त्या अनुभवाच्या आठवणी मात्र खूप सुखावह, Special असतात.' प्राची ती झुळूक आहे, हे अनुराग मनोमन जाणून होता. तिचा मार्ग वेगळा आहे, आपला मार्ग वेगळा आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. 'कुठल्याशा लाटेने दोन ओंडक्यांना वेगळं करण्याआधी खूप आहे की हे !'
आॅर्डर देऊन प्राची कधीच समोर येऊन बसली होती. 'आता थोड्या गप्पा होतील, गाॅसिप्स करू, काॅफी पिऊ नि चार क्षणांची सोबत, फक्त तिची नि माझी.... बास, अजून कसलीच अपेक्षा नाही. या क्षणी ही झुळूक फक्त नि फक्त माझी.' समोर आलेल्या Vanilla Latteचा मग ओठांवर टेकवत अनुराग असा नकळतच त्या चार क्षणांमध्ये हरवून गेला....
-कौस्तुभ
आॅर्डर देऊन प्राची कधीच समोर येऊन बसली होती. 'आता थोड्या गप्पा होतील, गाॅसिप्स करू, काॅफी पिऊ नि चार क्षणांची सोबत, फक्त तिची नि माझी.... बास, अजून कसलीच अपेक्षा नाही. या क्षणी ही झुळूक फक्त नि फक्त माझी.' समोर आलेल्या Vanilla Latteचा मग ओठांवर टेकवत अनुराग असा नकळतच त्या चार क्षणांमध्ये हरवून गेला....
-कौस्तुभ
Comments
Post a Comment