'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'
आज Whatsappवर ग्रहणकाळात काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल एका messageमध्येही न पुरणारा भलामोठा message सकाळी सकाळी आला. मलमूत्र विसर्जन करू नये, अन्नपाणी ग्रहण करू नये, शिवणकाम करू नये, तेल लावू नये, स्नान करावे, जप करावे, दानधर्म करावा, अमुक केलं तर हा रोग होईल, तमुक केलं तर तो रोग होईल. हे केलं तर या नरकात जाल, ते केलं तर त्या नरकात जाल असं बरंच काही लिहिलं होतं कुठल्या कुठल्या पुराणांचे हवाले देऊन. असा मेसेज बघून बहुतेक Whatsappही वैतागलं असावं. कारण शेवटी 'Message too long, truncated by Whatsapp' असं आलं होतं. Message वाचून अक्षरशः कपाळावर हात मारला.
"तो चंद्र बिचारा सतत सूर्याचा दाह अंगावर घेत आपल्याला रात्रीचा शीतल प्रकाश देत असतो. चंद्रग्रहणाच्या दिवशी पृथ्वीमातेला चंद्राची दया येते त्या दिवशी ती त्याच्या आणि सूर्याच्या मध्ये येउन त्याचा दाह कमी करते." Fantasy करायची असेल तर अशी करावी की ज्याला काही वैज्ञानिक पाया असेल. अशा नरक, रोग नि पुराणं यांच्या फॅंटस्या आजही चालतात या जाणीवेने सखेद आश्चर्य वाटलं. बरं या गोष्टी मानणारे कोणी अशिक्षित अडाणी नसतात. Whatsapp वापरतात म्हणजे तेही सगळ्यांसारखे किमान शाळेत गेलेले असावेत अशी अपेक्षा, आणि शास्त्रीय तत्वं आणि वैज्ञानिक दृष्टीकोन शिकलेले असतात. शिक्षणाच्या बळावर नोकरीधंदे करणारी माणसं असतात ही. शेवटी साक्षर आणि सुशिक्षित यांच्यात खूप मोठा फरक आहे हेच खरं.
तुकाराम महाराज, राजा राममोहन रॉय, म. फुले, न्या. रानडे, आगरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धाविरोधी आणि रूढी-कर्मकांडविरोधी जनजागृती करण्यात हयात घालवली पण त्यांच्या विचारांचं अस्थिविसर्जन आपण त्यांच्या हयातीतच केलं आणि नंतरही इमानेइतबारे चालूच ठेवलंय, अगदी आज २०१५ मध्येही, हेच यातून दिसून येतं. माणूस चंद्र आणि मंगळावर जाऊन पोचला तरी आपण मात्र आपले विचारांचे टेलिस्कोप्स अजून zoom in केलेलेच नाहीत.विश्वातले अद्भुत चमत्कार बघण्यासाठी ते वरती आकाशाकडे रोखण्याऐवजी आजही जुन्या समजांच्या खड्डयाकडेच रोखलेले आहेत. कितीही Whatsapp, Twitter, Facebook वापरून स्वतःला आधुनिक म्हणत दिवे ओवाळून घेतले तरी या मुखवट्यामागचा जुनाट चेहरा जोपर्यंत तोच आहे तोपर्यंत कधीच 'आपले ग्रहण सुटणार नाही'.
Happy Eclipse Day :)
|
–कौस्तुभ
Comments
Post a Comment