इंटरनेट @१९९९
Net Neutralityचा विषय चव्हाट्यावर आला आणि इंटरनेट रांगत असतानाचे दिवस आठवले. २०व्या शतकाची शेवटची २-३ वर्ष आणि २१व्या शतकाची पहिली २-३ वर्ष म्हणजे साधारण १९९९-२००२ च्या आसपासचा काळ. जमाना Dial-upचाच होता. VSNLचं नेट कनेक्ट करायला घेतलं की 'Status : Dialing' असं मॉनिटरवर दाखवत तो एक्सटर्नल मोडेम नामक रातकिडा "टिक् टिर्रर्रर्रर्रऽऽऽ" करत डायल करायला सुरुवात करायचा. VSNL हे सरकारी काम असल्यामुळे दोन मिनिटं तरी थांबावं लागायचंच ! Connect करायचे अनेक नंबर्स असले तरी सरकारी नियमां(!)प्रमाणे त्यातला एकच नंबर चालायचा. तो नंबर "टीं टीं टीं टीं टीं" केकाटत डायल व्हायचा. त्यानंतर परत त्या मोडेमच्या अंगात रातकिडा आणि जोडीला घुबड शिरून "टींऽऽऽ रूंऽऽऽ खर्रर्रर्रर्र टीं टूं टक् खर्रर्रर्र" असे भयंकर आवाज येऊन मॉनिटरवर 'Verifying username and password' असा मेसेज् दिसायचा. हा मेसेज् दिसला म्हणजे बाबा आणि मी इंडिया जिंकल्याची दुर्मिळ (त्यावेळी तेही दुर्मिळच होतं !) घटना घडल्यासारखे क्षण दोन क्षणांची दिवाळी साजरी करत असू, कारण असा मेसेज् येणं हे खरंच दुर्मिळ होतं आणि आता ९०% खात्री असे नेट कनेक्ट् होण्याची. शेवटी ' Registering your computer onto the network' असा मेसेज् येऊन जेहत्तेकाळाचे ठायी नेट कनेक्ट् झाल्याचा शुभसंदेश येत असे. पण हे झालं म्हणजे मोहीम फत्ते नव्हे ! मूल शाळेत गेलं म्हणजे कामगिरी पूर्ण नाही होत. शाळेतली त्याची प्रगतीही नेटाने नीट बघायला लागते तसं या नेटला कनेक्ट् झाल्यावर स्पीड किती हेही नीट बघावं लागे. तोही constant नसायचा. 10-15 kbps म्हणजे तत्कालीन 'नेट'का स्पीड होता तो किंवा तेव्हाचं 3G ! < 10kbps स्पीड मिळाला की 3Gचा रीचार्ज करूनही 3G ऐवजी 2G कनेक्शन् मिळाल्याचा आंबटपणा आपोआप चेहऱ्यावर यायचा. 20+ kbps स्पीड म्हणजे तेवढ्याच रीचार्जमध्ये 4G मिळाल्याने अष्टसात्विक भाव वगैरे दाटून यायचे. पण हा योग म्हणजे अंगारकीसारखाच कधीतरीच येई. बुद्धिदाता गजानन त्या भावी इंटरनेट महाराक्षसापासून आमचा बचावच करत होता. Privilege मिळालं की गैरफायदा उठवला जाईल म्हणूनच बहुतेक.
नेट कनेक्ट् झाल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने झटकन 'इंटरनेट एक्सप्लोअरर्'कडे हात जायचा, कारण नेट लावलं की टेलिफोन कॉल्स जायचे ! शिवाय तेवढ्या वेळेत फोन बंद राहणार ! कोणालाही फोन केलेला नाही तरी कॉल जातात म्हणजे काय ! ही मानसिकता. मग शक्य तितक्या पटपट काम उरकून घ्यायचं आणि कॉम्प्युटरच्या 4GB हार्डडिस्कवर किंवा फ्लॉपीवर (1.44MBच्या छोट्या) उतरवून घ्यायचं आणि क्षणाचाही विलंब न करता disconnect करायचं. ३ मिनिटाचा पल्स् पूर्ण व्हायच्या आत जर बंद करता आलं तर अतिरिक्त कॉल न गेल्याचे किंवा गेलाच कॉल पुढचा तर 'आता गेलाच आहे कॉल तर पूर्ण ३ मिनिटं वापरू' हे typical कोकणस्थी भाव उमटायचे. तेव्हाच्या कामांना 2-4GBची हार्डडिस्क आणि 1.44MBची फ्लॉपी म्हणजे त्यावेळची शेरलॉक होम्स-डॉ. वॉट्सन ही अतींद्रिय शक्ती नसलेली सामान्य माणसंच, ती पुरेशी होती. 64 GB चा पेन ड्राइव्ह् किंवा 2-4 TB (म्हणजे अंदाजे 2000-4000 GB)ची एक्स्टर्नल् हार्ड डिस्क नामक अजस्र Hulk स्वप्नातही आले नव्हते. चकचकीत गूगल क्रोमचा जन्म व्हायला ७-८ वर्ष तरी होती. 'इंटरनेट एक्स्प्लोअरर्' हाच क्रोमयोग.... सॉरी 'कर्मयोग' होता.
बालमोहन शाळेत नुकत्याच सुरू केलेल्या 'संगणक' विषयाची इटुकली प्रोजेक्ट्स गृहपाठ म्हणून करायला इतकी मर्यादित सामग्री पुरेशी होती. हातात लेटेस्ट् अपडेटेड् Android Lolipop किंवा मांडीवर Intel i7 प्रोसेसर असलेला डेल् लॅपटॉप तेव्हा नसूनही आज नसलेलं समाधान मात्र त्यात होतं. संगणक आणि इंटरनेटतज्ज्ञ माधव शिरवळकरांच्या लेखमालेतून बाबा इंटरनेट शिकत होते, शिकता शिकता थोडे ज्ञानकण माझ्यावरही पडत होते. 'लहान मुलांसाठी गेम्सच्या वेबसाईट्स्' हा लेख आल्यावर तर ते शीर्षक वाचून नुसता थयथयाट केला होता, त्यात दिलेल्या prongo.com आणि bonus.com या दोन गेम्सच्या साईट्स् बघण्यासाठी. आज सहजपणे लिंक्स् क्लिक करण्याच्या जमाना असताना तेव्हा मात्र त्या दोन साईट्स् बघायला बाबांच्या पर्यवेक्षणाखाली एक मोठा सोहळाच पार पडला होता.
अशी ती इंटरनेटची बाल्यावस्था होती. Net Neutrality वगैरे कल्पनांना जन्म घ्यायला बराच पुढचा पल्ला गाठावा लागणार होता. पण आमच्याकडे सोबतीला संध्याकाळी बाहेर खेळायला जाणं, नियमितपणे रोज सकाळी तीर्थरूपांच्याआधी लोकसत्ता/'महाराष्ट्र टाईम्स' वर झेप घेणं (तेव्हा तो 'म. टा.' व्हायचा होता, अजून 'महाराष्ट्र टाईम्स्'च होता), अवांतर वाचन, अभ्यास हेही व्यवस्थित चालू होतं. पारंपारिक दिनक्रमात या आधुनिक वाऱ्याच्या झुळकेने लहानपण आणखी आल्हाददायक केलं. दप्तरात पाठ्यपुस्तकातल्या ज्ञानेश्वर-टिळक-गांधी-पु.ल. यांच्या खांद्याला खांदा लावून अवांतर वाचनाच्या पुस्तकातला विल्यम एच्. तिसरा उर्फ बिल् गेट्स् हाही ऐटीत बसला होता. आतली मूळ पानं तीच ठेवून नवं कव्हर घातलेल्या या पुस्तकांचं दप्तर पाठीवर घेऊन आम्ही आयुष्याचं पहिलं दशक पार केलं. याचवेळी नव्या सहस्रकाचा हात धरत त्याच्यासोबत तंत्रज्ञानाचं माप ओलांडून आमच्या घराघरात आलेल्या डिजिटल क्रांतीचं आम्ही सहर्ष स्वागत केलं.... Proud to be a 90s kid.....
'जुन्यात मिसळले नवे, हाती शोभे इतिहासासवे, भविष्यही' :)

-कौस्तुभ दीक्षित
१८ एप्रिल, २०१५
१८ एप्रिल, २०१५

Comments
Post a Comment