रविवार संध्याकाळ
रविवारची एक निवांत संध्याकाळ. यावेळी मी एकतर मित्रांबरोबर भटकत असतो नाहीतर घरात काहीतरी टाईमपास करत बसून असतो. आज मात्र खालीच एक चक्कर मारायचा मूड येतो. आणि मी लगेच बाहेर पडतो. अशाप्रकारे संध्याकाळची चक्कर मारायला मी फारसा जात नाही. आजीकडे सुट्टीत विरारच्या JP Nagar मध्ये जायचो तेव्हा जायचो असा, त्यानंतर फारसा नाही. सोसायटीच्या Gate 1 पासून Gate 2 पर्यंत बाहेरून चक्कर मारायचं ठरवतो. बेंगळुरूतलं गाव वाटावं असं कोडिचिक्कनहळ्ळी संध्याकाळचं दिसत असतं. मुलाला फिरायला घेऊन निघालेली आई, कुत्र्याला घेऊन निघालेलं जोडपं, नाक्यावरचया वाण्याकडे, भाजीवाल्याकडे खरेदी करणाऱ्या गृहिणी दिसतात आणि आपल्याला JP Nagar मधलं त्यावेळचं एकुलतं एक शॉपिंग सेंटर डोळ्यांसमोर येतं. मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये बास्केट घेऊन खरेदीला जायच्या दिवसांआधी पहिल्यांदा ही पद्धत तिकडे पाहिलेली… मी पुढे चालत राहतो चाटवाल्याभोवती कोंडाळं करून पाणीपुरी खाणारे शौकीन दिसतात आणि आपण विरारहून थेट माटुंग्याच्या घरी येतो. घराजवळच्या भेळपुरीवाल्याकडे उभे राहून भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी किंवा पाणीपुरी खाणारे आपणच दिसतो…. नाक्याजवळून...