रविवार संध्याकाळ
रविवारची एक निवांत संध्याकाळ. यावेळी मी एकतर मित्रांबरोबर भटकत असतो नाहीतर घरात काहीतरी टाईमपास करत बसून असतो. आज मात्र खालीच एक चक्कर मारायचा मूड येतो. आणि मी लगेच बाहेर पडतो. अशाप्रकारे संध्याकाळची चक्कर मारायला मी फारसा जात नाही. आजीकडे सुट्टीत विरारच्या JP Nagar मध्ये जायचो तेव्हा जायचो असा, त्यानंतर फारसा नाही.
सोसायटीच्या Gate 1 पासून Gate 2 पर्यंत बाहेरून चक्कर मारायचं ठरवतो. बेंगळुरूतलं गाव वाटावं असं कोडिचिक्कनहळ्ळी संध्याकाळचं दिसत असतं. मुलाला फिरायला घेऊन निघालेली आई, कुत्र्याला घेऊन निघालेलं जोडपं, नाक्यावरचया वाण्याकडे, भाजीवाल्याकडे खरेदी करणाऱ्या गृहिणी दिसतात आणि आपल्याला JP Nagar मधलं त्यावेळचं एकुलतं एक शॉपिंग सेंटर डोळ्यांसमोर येतं. मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये बास्केट घेऊन खरेदीला जायच्या दिवसांआधी पहिल्यांदा ही पद्धत तिकडे पाहिलेली… मी पुढे चालत राहतो चाटवाल्याभोवती कोंडाळं करून पाणीपुरी खाणारे शौकीन दिसतात आणि आपण विरारहून थेट माटुंग्याच्या घरी येतो. घराजवळच्या भेळपुरीवाल्याकडे उभे राहून भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी किंवा पाणीपुरी खाणारे आपणच दिसतो…. नाक्याजवळून आपण आपल्या सोसायटीकडे जाणाऱ्या गल्लीत वळतो. जाता जाता एक सात-आठ वर्षांचं पोर भिंतीला टेकून आणि डोळ्यावर हात ठेवून लपाछपीतआपल्यावर आलेलं राज्य घेताना दिसतं. थोड्याच अंतरावर आणखी मुलंही लपलेली दिसतात. बालपणीच्या स्मृती आपल्याला ‘शहा बिल्डिंग’मध्ये घेऊन जातात. लपाछपीचाच भाऊ असलेला ‘स्टॉप-पार्टी’ (उच्चारी ‘स्टॉप्पार्टी’) खेळताना आपण आणि प्रसाद-विनम्र वगैरे मित्र आठवतात.
असा हा साधारण एखाद किलोमीटरचा वॉक… पण सफर मात्र गेल्या २० एक वर्षांतल्या हायलाईट्सची करून देतो, आणि आपल्याला जाणवतं… पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, आपण बदललोय, सभोवतालची माणसं बदलली आहेत, शहर बदललंय, भाषा बदलली आहे, पिढी बदलली आहे… पण अजूनही तेच मुलांना घेऊन फिरायला जाणं आहे, तेच वाण्याकडे जाणं आहे, तसंच कुत्रं फिरवणं आहे आणि अगदी लपाछपीही तीच आहे… पुलंच्या भाषेत सांगायचं तर सतत बदलणाऱ्या जगात एखादं न बदलणारंही काहीतरी असायला हवं… ते आहे. ‘संस्कृती’ अजूनही आहे. संस्कृती, जी फक्त साहित्य-संगीत आणि कलेतून प्रतीत होत नाही… अशी दैनंदिन जीवनातही बाहेर दिसते. ती टिपणं आणि अनुभवणं आपल्या हातात असतं.
-कौस्तुभ
२३ जुलै २०१८
Comments
Post a Comment