इंटरनेट @१९९९
Net Neutralityचा विषय चव्हाट्यावर आला आणि इंटरनेट रांगत असतानाचे दिवस आठवले. २०व्या शतकाची शेवटची २-३ वर्ष आणि २१व्या शतकाची पहिली २-३ वर्ष म्हणजे साधारण १९९९-२००२ च्या आसपासचा काळ. जमाना Dial-upचाच होता. VSNLचं नेट कनेक्ट करायला घेतलं की 'Status : Dialing' असं मॉनिटरवर दाखवत तो एक्सटर्नल मोडेम नामक रातकिडा "टिक् टिर्रर्रर्रर्रऽऽऽ" करत डायल करायला सुरुवात करायचा. VSNL हे सरकारी काम असल्यामुळे दोन मिनिटं तरी थांबावं लागायचंच ! Connect करायचे अनेक नंबर्स असले तरी सरकारी नियमां(!)प्रमाणे त्यातला एकच नंबर चालायचा. तो नंबर "टीं टीं टीं टीं टीं" केकाटत डायल व्हायचा. त्यानंतर परत त्या मोडेमच्या अंगात रातकिडा आणि जोडीला घुबड शिरून "टींऽऽऽ रूंऽऽऽ खर्रर्रर्रर्र टीं टूं टक् खर्रर्रर्र" असे भयंकर आवाज येऊन मॉनिटरवर 'Verifying username and password' असा मेसेज् दिसायचा. हा मेसेज् दिसला म्हणजे बाबा आणि मी इंडिया जिंकल्याची दुर्मिळ (त्यावेळी तेही दुर्मिळच होतं !) घटना घडल्यासारखे क्षण दोन क्षणांची दिवाळी साजरी करत असू, कारण असा मेसेज् येणं हे खरंच ...