एका 90s kidच्या सुट्टीतला एक दिवस....

काल अनेक दिवसांनी माझी बोटं शिवशिवली, कीबोर्डला व्यायाम मिळाला. मी आज लिहितोय सुट्टीतला आजी-आजोबांकडचा  एक random दिनक्रम. वाचून तुम्हालाही कुठेतरी तुमच्या लहानपणची आठवण होईल, आजी आजोबा आठवतील....
--------------------------------------------------------------------------------------------------------------

आजी, अप्पा आणि मी... माझ्या दुसऱ्या वाढदिवशी
मला भाषेची (विशेषतः मराठी) आवड निर्माण होण्यात आजी-आजोबांचा मोठा वाटा होता. लहानपणापासून सतत श्लोक, तसंच रामरक्षा, नवग्रह स्तोत्र, नवनाग स्तोत्र अशी छोटीमोठी स्तोत्र कानावर पडत असत. माझे आजी-आजोबा (वडिलांकडून) हे दोघेही भाषा शिक्षक. आजोबा (त्यांना आम्ही ‘अप्पा’ म्हणायचो) शाळेत मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी शिकवायचे. आजी हे तसेच इतरही विषय शिकवायची. अप्पा म्हणजे कै. श्री. शंकर नारायण दीक्षित, मूळ परशुराम (चिपळूण)चे. मुंबईच्या सुविद्यालय, बोरिवली शाळेचे पहिले मुख्याध्यापक. त्यांना १९८७चा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कारचे मानकरी. तर आजी शैलजा शंकर दीक्षित, निवृत्त मुख्याध्यापिका, सरस्वती मंदिर, माहीम, मुंबई.
तर असा असायचा माझा सुट्टीचा दिवस-

शाळेला मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी असली की सुट्टी लागल्या लागल्या घरून (म्हणजे माहीमहून) ट्रेनमधून वसईची खाडी पहात विरारला आजी-अप्पांकडे धूम ठोकायची हा माझा अलिखित नियम होता. सुट्टीतले typical दिवस अजूनही आठवतात. मी मुलखाचा आळशी तर अप्पा कमालीचे चटपटीत (त्यांच्या भाषेत “QUICK”). त्यामुळे मला सकाळी उठवायची जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतलेली असे. तरीही माझा आळशी स्वभाव लक्षात घेऊन थोडी सूट मिळायची. बहुतेकदा त्यांची आंघोळ करून पूजा चालू असे किंवा झालेली असे तेव्हा अस्मादिक डोळे उघडत (नाहीच उठलो तर अप्पा उठवत). लख्ख गोरा वर्ण, तीन चतुर्थांश टक्कल, मोठ्या फ्रेमचा चष्मा, कपाळाच्या मधोमध पिंजर, अंगावर रुळणारं जानवं आणि रक्तवर्णी सोवळं नेसलेलं अशा रूपातल्या आजोबांच्या अस्सल कोकणस्थ ब्राह्मणी मूर्तीचं दर्शन घेऊन अनेकदा माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. “शंभो, उठा... दीक्षित कसे पाहिजेत QUICK” असा पुकारा होत असे. काही वर्षांनी माझा चुलतभाऊ प्रणव याच्या जन्मानंतर ही जबाबदारी त्याच्याकडे आली. हे बंधुराज सकाळी लवकर उठणे आणि देवाधर्माच्या बाबतीत अगदी आजोबांवर गेलेले. “कौस्तुभ दादाला उठव” म्हटलं की आमचे मऊमऊ अंगाचे हे गोरेगोरे कनिष्ठ चुलतबंधू अंगावर रेंगत, किंवा प्रेमाने चेहऱ्यावरून हात फिरवत मला उठवत. त्यावेळी नुकताच हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा आला होता. त्यात ती दोघं भावंडं हळुवारपणे एकमेकांच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत असत. त्याप्रमाणे मीही प्रणवला तसं करत असे. तोच प्रयोग हे साहेब मला उठवताना करायचे. त्या कोवळ्या जीवाचा चेहऱ्याला होणारा मऊ रेशमी स्पर्श अगदी जीव सुखावून जायचा, रोमांच आणायचा.
एव्हाना माझी उरलीसुरली झोप कुठल्या कुठे पळून जायची. प्रणवचा तो कोवळा हात सोडूच नये असं कितीतरी वेळ वाटायचं. मग उठायचो. दात घासून स्वयपाकघरात जायचो. नाश्त्याला कांदा-टोमॅटो घालून गरम गरम धिरडी किंवा उपमा आणि सोबत लोणचं/सॉस. या व्यतिरिक्त अशी अप्रतिम धिरडी खाल्ली ती फक्त आई-बाबांच्याच हातची. तिथेच आजीने मगभर दूध ठेवलेलं असायचंच. दुधात चवीसाठी बहुतेकदा काकांनी आणलेली कुठली ना कुठली औषधी गुणधर्म असलेली कोको पावडर असे. काका आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे त्यांना यातलं सगळं माहीत ! कधी टीव्ही बघत किंवा कधी नुसतंच स्वयपाकघरात बसून नाश्ता व्हायचा. नाश्ता झाला की आंघोळीला पिटाळणी व्हायची. आंघोळीनंतर देवघरात. मग “केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः” म्हणत संध्या सुरु व्हायची. अप्पा बाजूला बसून व्यवस्थित संध्या आणि जप करवून घेत असत. मांडी घालून बसून बसून पाय प्रचंड दुखत, त्यामुळे उभ्याने “श्री सूर्याय अर्घ्यदाने विनियोगः” म्हणत करायचं अर्घ्यदान आणि “प्राच्यै दिशे इंद्राय नमः” पासून “अधराये दिशे अनंताय नमः” असं दिशावंदन करत “संध्यायै नमः विद्यायै नमः” हा समारोपाकडचा भाग माझा आवडता होता. यापैकी अप्पांनी ओंजळीत सोडलेलं पाणी उभं राहून सूर्याला ताम्हनात अर्घ्य म्हणून दान करताना मला जाम थ्रिलिंग वाटायचं. संध्या-जप झाला की मग जेवण होईपर्यंत उनाडायला मोकळे ! मग कधी तळमजल्यावरच्या हर्षूबरोबर क्रिकेट (हा माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे मला नेहमी हरवायचा), कधी प्रणवशी खेळायचं, कधी काकूचे भाचे अक्षय-अमेय आलेले असायचे त्यांच्याबरोबर खेळायचं, किंवा लहान असताना खूप आधी जवळच माझे चुलतभाऊ तुषार आणि अभिषेक जवळच रहायचे त्यांच्याकडे जायचं... आणि यापैकी काहीच नसेल तर मस्त तंगड्या ताणून टीव्ही बघत एक प्रसन्न सकाळ संपायची आणि जेवणाची वेळ व्हायची.

आजी म्हणजे खरोखर सुगरण !! स्वयपाकघरातून येणाऱ्या वास आणि आवाजामुळे भूक आधीच चाळवलेली असायची. १-१.३० वाजेपर्यंत काका दवाखान्यातून यायचे. मग रसना सरबताचा कार्यक्रम व्हायचा. कधीकधी येताना काका शहाळं आणायचे. पानं घेण्यापूर्वी टेबल उघडायची जबाबदारी माझी असे. मग सगळेजण मिळून जेवायला बसत असू. ताट पूर्ण भरलेलं ! पोळी-भाजी-कोशिंबीर-आमटी-गोड-लोणचं-भात-लोणचं-दही असा रोजचा व्यवस्थित बेत असायचा. ‘चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा’ करत चित्राहुती घालून जेवायला मोठ्या जोमाने सुरुवात केली तरी घरी आईच्या हातचे फुलके खायची सवय असल्यामुळे आजीच्या घडीच्या २ पोळ्या मला जाता जायच्या नाहीत. तरीही कसाबसा जेवण संपवायचो. अप्पा इतके fast जेवायचे आणि मी इतका slow जेवायचो की माझ्या एका जेवणाच्या वेळेत अप्पांची ३-४ जेवणं तरी नक्कीच झाली असती. “एक एक शीत ओवीत बसतो” हे अप्पांचं मला उद्देशून ठरलेलं वाक्य (‘ओवीत’चा ‘वी’ वर जोर देऊन अगदी कोकणस्थी थाटात होणारा उच्चार). पण माझ्या सोबतीला आजी असायची. माझ्याइतकी नसली तरी आजीही काहीशी हळूच जेवते. त्यामुळे आजीचं जेवण होऊन आवरायला घेईपर्यंत इकडे माझं जेवण होत आलेलं असायचं. मग जेवणाची शेवटची काही स्टेशनं (घास) आजीच्या धक्क्यांनी पार करून अखेर ‘अमृतापिधानमसि’ व्हायचं.
मग आजीबरोबर थोडावेळ ‘७-८’, ‘चित्र लॅडीज्’ असे काहीतरी पत्त्यांचे खेळ. मग आजी झोपायची. मग अप्पा, काका, सगळेच झोपायचे. मी मात्र काहीतरी खेळत बस, टीव्ही बघ, चित्र काढ/रंगव, घरातल्या काकांच्या दवाखान्यात जाऊन वजन कर, कुणी असेल जागं तर त्याला स्टेथस्कोपने तपास, काका पेशंटना देतात तशा पद्धतीने हातात गोळ्या घेऊन डॉक्टरांची नक्कल करत बस असले काहीतरी उद्योग एकटा करत बसायचो. या उद्योगांत रममाण असताना हळूहळू उन्हं कलू लागायची आणि एव्हाना एक निवांत दुपार खरोखरच निवांतपणे सरलेली असायची.

विरार पश्चिमेला स्टेशनपासून काहीसं लांब कोफराड गावात वसलेलं पांढऱ्या तिमजली इमारतींचं ‘J. P. नगर’ अर्थात ‘जयंत परांजपे नगर’ हे एक छोटसं गावच होतं (सध्याचं मला माहीत नाही). संध्याकाळ झाली की प्रत्येक इमारतीबाहेर असलेल्या कट्ट्यांवर पांढरा शर्ट आणि विजार किंवा पांढराशुभ्र सदरा-लेंगा घातलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गप्पांचा फड जमायला लागे. आसपास मुलांचं क्रिकेट रंगात येऊ लागलेलं असायचं. तसंच प्रत्येक चार इमारतींच्या मध्ये असलेल्या मैदानातही क्रिकेट चाले. मी कधीकधी खेळायचो. याशिवाय J. P. नगरात एक खूप मोकळी मैदानासारखी जागा होती. पावसाळ्याव्यतिरिक्त तिथेही क्रिकेट रंगलेलं असे. तिथून बसलेला एखादा सणसणीत फटका कधीकधी समोरच्या छोटेखानी शॉपिंग सेंटरची काच तोडून जाई. मला या शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी करायला प्रचंड आवडायचं. तिथला revolving entrance मला जाम आवडायचा. लाल किंवा निळं बास्केट घेऊन खरेदी करायला मी कधीकधी जायचो. हे सेंटर एक मराठी गृहस्थ चालवायचे (नंतर त्यांनी एका गुजराती माणसाला विकलं). अगदी लहानपणी पाण्याचा तुटवडा असताना शॉपिंग सेंटरच्या बाजूच्या खोलीत एक गुरखा कॅनमध्ये पाणी भरून देत असे. नंतर नंतर असे कॅन घेऊन काका आणि मी गाडीतून कुठेतरी पाणी भरून आणायला जायला लागलो. या शॉपिंग सेंटरच्याच जवळ एक गणपतीचं देऊळ आणि त्याच्या बाजूला लहान मुलांची खेळायची साधनं. तिथल्या २ घसरगुंड्या, झोपाळे ,सी-सॉ, लटकायचा डबल बार यावर तर माझ्या कित्येक संध्याकाळी गेल्या आहेत. रविवार असेल तर काका त्यांची प्रिमियर पद्मिनी गाडी काढून फिरायला न्यायचे. नाहीतर एरवी ते दवाखान्यात जायला निघत असताना मीही दूध-बिस्किट खाऊन फिरायला बाहेर पडायचो. मनसोक्त खेळून घराकडे मोर्चा वळवायचो. एव्हाना काळोख पडून J. P. नगरातल्या घरोघरी ट्यूबलाइटस लागलेल्या असायच्या. घरोघरी दिवेलागण झालेली आणि आजीही माझी त्याचसाठी वाट बघत असे.

मी लहान असताना कधीकधी अभिषेकही संध्याकाळी घरी यायचा. ‘शुभंकरोती कल्याणम्’ झालं की मग तो, मी आणि आजी तिघे आरत्यांचा सपाटा लावायचो. एकदा अभिषेक (अभी)च्या हातून चुकून आजीकडच्या आरतीच्या २ पुस्तकांपैकी एका पुस्तकाचं पान फाटल्यामुळे मी अभीवर जाम चिडलो होतो. पुन्हा मी ते फाटकं पुस्तक कधीच आरतीला वापरलं नाही. सगळ्या आरत्या म्हणून घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली, सदा सर्वदा योग तूझा घडावा, ज्या ज्या ठिकाणी मन जय माझे, गणंजयो गणपतिर्, निरोपगीत (जाहले भजन) पर्यंत पारायण चाले. पुढे अभी बोरिवलीला रहायला गेल्यानंतर आणि प्रणव मोठा झाल्यानंतर अनेक नव्या श्लोकांची/गाण्यांची भर पडली होती. मी तेही पाठ केले. हे झालं की काकांच्या (समोरच्या) घरात अप्पांबरोबर पाणी भरायला धावायचं. पाणी भरण्यापेक्षा झोपाळ्यावर बसून अप्पांबरोबर झोके घेणं आणि झोके घेत घेत म्हटली जाणारी रामरक्षा आणि इतर स्तोत्र याचं मला विशेष आकर्षण होतं. आज माझ्यामते सुट्टीच्या काळात झोपाळ्यावरची रामरक्षा हे सर्वात बहुमूल्य क्षण होते. (मी मध्येच काका-काकूच्या खोलीत जाऊन काकूची पावडर लावून सेंट वगैरे मारून यायचो ! :D
पाणी भरून झाल्यानंतरही काही काळ हे स्तोत्रपठण चाले. थोड्यावेळाने जेवणाची वेळ होई. माझी जेवणाची परत दुपारचीच slow कथा. कधी स्वयपाकघरात गप्पा मारत किंवा टीव्हीवर एखादा सिनेमा किंवा ‘आभाळमाया’ बघत जेवण होई. थोडावेळ गप्पा मारून काका-काकू झोपायला जात आणि ती मंतरलेली वेळ येई. खरंतर दिवस संपायची वेळ ती, पण तीच खरी मंतरलेली असे. सगळं आवरलं की आतल्या खोलीत (जे देवघरही होतं) आजी आणि मी.... मी आजीच्या मांडीवर.... हळूहळू आजीच्या मांडीवर मावेनासा झाल्यावर डोकं मांडीवर आणि बाकीचं अंग गादीवर.... देवघरातून येणारा इवल्याशा बल्बचा मंद प्रकाश.... त्या प्रकाशात दिसणारी आजीची शांत मूर्ती.... डोक्यावर हळुवार थोपटणारा तिचा हात.... अशा भारलेल्या वातावरणात सुरू व्हायचं आजीच्या गोड आणि दैवी भासणाऱ्या आवाजात....
‘हेतवे जगतामेव संसारार्णव सेतवे
प्रभवे सर्वविद्यानां शिवाय गुरवे नमः’
ते श्लोक एकेक कानावर पडता पडता झोपेचा प्रवास सुरू व्हायचा. नित्यक्रमाप्रमाणे शेवटचा श्लोक ‘सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः’ मधली शेवटची ओळ... ‘संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते’.... आजीचा शेवटचा लांबलेला ‘जायतेSSS’ संपला तरी ते भारलेपण संपायचं नाही. कधी झोप लागलेली असायची, कधी नाही. शेवटी ‘दुःस्वप्नः सुस्वप्नः भवेत्’ म्हणून आजी माझं डोकं उशीवर (आजीची साडी) ठेवायची, पांघरूण (पणजी माईची साडी) घालायची. ‘आजीची साडी उशाला, माईची साडी पांघरायला, कौस्तुभ बाळाला झोपायला’ असं आजी लाडात म्हणायची. अशाप्रकारे देव, आजी आणि पणजी यांच्या सुरक्षित कवचात मी हळूहळू निद्राधीन व्हायचो.... दिवसभराचं हेच चक्र संपूर्ण सुट्टीभर अनुभवण्यासाठी....
आता ते दिवस नाहीत, मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी नाही, आता अप्पाही नाहीत, आजी काकांबरोबर बोरिवलीला, मी एकटा बंगलोरला.... खरंतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी.... पण अचानक कधीतरी ते दिवस मनाच्या पटलावर असे in a flash उमटून जातात आणि झोपायला उशीर होत असूनही त्या आठवणींच्या ओढीने असे शब्दबद्ध होऊन जातात.....
-कौस्तुभ दीक्षित
११ जून, २०१५

Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Code मंत्र' - Review

'Suits' that suits well...