'दिव्यत्वाची जेथ प्रचीती'


- महिन्यांपूर्वीची गोष्ट..... एका आगामी बहुचर्चित सिनेमाची एकएक गाणी यूट्यूबवर यायला लागली होती. प्रोमोज् आणि गाण्यांवरून हा सिनेमा दृक्-श्राव्य मेजवानी असणार याची खात्री वाटत होती. आधारित कलाकृती असल्यामुळे प्रभाव राहू नये म्हणून मुद्दाम मूळ कलाकृती पहायचं टाळत होतो. काही दिवसांनी बहुप्रतीक्षित असा संपूर्ण सलग Jukebox यूट्यूबवर आला. रात्री हेडफोन्स् घालून सगळी गाणी लगेच अधाशासारखी ऐकली आणि 'कान तृप्त होणं' म्हणजे काय याचा याचि देही याचि कर्णी अनुभव घेतला. हो.... बरोब्बर ओळखलंत.... सिनेमाचं नाव 'कट्यार काळजात घुसली'....

'तेजोनिधी लोहगोल', 'घेई छंद मकरंद' (दोन्ही चाली), 'दिन गेले', 'मुरलीधर श्याम', 'सुरत पिया की' अशी मूळ नाटकातली पदं शंकर महादेवन्, राहुल देशपांडे आणि महेश काळे या सर्व(सूर)श्रींच्या कसलेल्या आवाजात ऐकताना दारव्हेकर मास्तर, अभिषेकी बुवा, पं. वसंतराव देशपांडे या देवत्रयीला मनोमन हात जोडले जात होते. या पदांची रंगत वाढवणाऱ्या 'सूर निरागस हो', 'मन मंदिरा', ('या भवनातिल गीत पुराणे' ऐवजीच्या) 'सुर से सजी संगिनी', 'शिव भोला भंडारी', 'यार इलाही' कव्वाली, तराणा हे ऐकताना शंकर-एहसान-लाॅय या त्रिकूटाला सलाम केला जात होता. तराणा संपला, खाँसाहेब-सदाशिव अर्थात राहुल देशपांडे-महेश काळे यांची 'सुरत पिया की'-'घेई छंद'ची भन्नाट जुगलबंदीही संपली. VLC Media Playerची डिजिटल तबकडी शेवटची दोन गाणी शिल्लक असल्याचं Indication दाखवत होती. त्यातलं पहिलं गाणं सुरू झालं. ती भैरवी होती. त्या भैरवीची ती चार मिनिटं मी या पृथ्वीतलावर नव्हतो. सात सुरांच्या सप्तर्षी तारकासमूहाची सफर मला एकाच अरुण-रथात बसून रात्रीच घरबसल्या घडली होती, आणि ती सफर घडवणाऱ्या अवलिया अरुणाचं नाव होतं 'महेश काळे'.....
'अरुणी किरणी धरणी-गगन चमके
भ्रमित भ्रमर करी गूंजन हलके....'
भैरवी सुरू झाली. वेग अंगात भिनवणारा अतिद्रुत लयीतला त्रिताल, सिनेमाच्या कथेचं आणि संगीताच्या सात स्वरांच्या निरागस रूपाचं सार सांगणारे नेमके आणि समर्पक अर्थवाही शब्द, थीम बरोब्बर पकडणारी चाल वाद्यमेळ, आणि त्या जलद लयीतही सुरांशी इमान राखणारा तो आवाज.... गाण्याच्या सगळ्या अंगांचा सुरेख मेळ 'भारत के हृदय में' वसलेल्या त्या काल्पनिक 'नगरी विश्रामपूर'मध्ये असा घडून आला. अयोध्या नगरीत रामकथा गाणाऱ्या कुश-लवांचं गायन ऐकताना

'सात स्वरांच्या स्वर्गामधुनी,
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी,
यज्ञमंडपी आल्या उतरूनी,
संगमी श्रोतेजन नाहती....'
असं व्हावं तशीच काहीशी झालेली ती माझी अवस्था....
भैरवी शेवटाकडे येत असताना तिसऱ्यांदा 'सूऽऽऽऽऽ निराऽऽऽऽऽगस होऽऽऽऽऽ' हे शब्द आले आणि वाटलं की आधीच तनमनाचा ताबा घेतलेल्या या भैरवीने 'एव्हरेस्ट' गाठलंय !! पण माझा समज चुकीचा होता !! हे तर फक्त क्र. उंचीचं 'कांचेनजुंगा' शिखर होतं !! Surprise Package म्हणून चौथं 'सूऽऽऽऽऽ निराऽऽऽऽऽगस होऽऽऽऽऽ' आलं आणि गाण्याने 'Mount Everest' गाठलं !!!!! त्या अनपेक्षित धक्क्यातून सावरल्यामुळे गाणं संपल्या संपल्या क्षणार्धात हेडफोन्स काढून टाकले आणि पुढचे काही क्षण सुन्न बसून राहिलो.... भारावून टाकणारी गाणी खूप ऐकली होती पण हा अनुभव 'दिव्य' होता. स्वरांच्या कैलासावर भोळ्या-निरागस 'महेशा'च्या त्या मिनिटांच्या तांडवनृत्याने अक्षरशः हादरायला झालं. परत परत तो अनुभव घेतला. इतका की शेवटचं राहिलेलं Title Song कितीतरी वेळ लावावसंच वाटत नव्हतं.
अजूनही असाच अनुभव येतो. आज त्या अनुभवावर सरकारी मोहोरही उमटली. '६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक महेश काळे (गीत-अरुणी किरणी)' ही बातमी सकाळीच आली. एका अनमोल हिऱ्याची योग्य पारख झाल्याचं समाधान वाटलं. या गीताचे सगळे शिल्पकार... गीतकार Sameer Samant, संगीतकार Shankar-Ehsaan-Loy, गायक Mahesh Kale, सिनेमाचे दिग्दर्शक Subodh Bhave आणि संपूर्ण टीमचं मन:पूर्वक अभिनंदन.... काळजात घुसणाऱ्या निरागस सुरांच्या कट्यारीवर आज एक नाव कायमचं कोरलं गेलं.... 'महेश काळे' 🎶🗡💔.... आपलं पुनश्च अभिनंदन !!!! आता आस लागलीय ती तुमचं गाणं या कानांनी प्रत्यक्ष मैफिलीत ऐकण्याची.....

तुमचा नवा चाहता,
कौस्तुभ दीक्षित.
(२८ मार्च २०१६)

Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Code मंत्र' - Review

'Suits' that suits well...