Access Card... ऑफिसचं आणि जगण्याचं !

शुक्रवारी ऑफिसात earphones विसरलो. शनिवारी काही कामानिमित्त ऑफिसच्या इथूनच जाणं होणार होतं. तेव्हाच जाऊन deskवरचे earphones घेऊ असं ठरवलं. पण शनिवारी बाहेर पडलो तेव्हा I-card/Access Card घ्यायचं विसरून गेलो. मग temporary ID आणि Access घेऊन जाऊ असा विचार केला. त्याप्रमाणे  ID मिळालं पण Access Cardचा server down होता त्यामुळे ते मिळू शकलं नाही. कोणीतरी असेल आतमध्ये त्याच्याकडून Access घेऊ असा विचार केला आणि वर गेलो. पण सुट्टीमुळे कोणीच नव्हतं. शेवटी एकजण आला आणि त्याने access दिला खरा पण बराच वेळ ऑफिसच्या दरवाजाबाहेर थांबावं लागलं. त्याआधी कितीतरी वेळ काचेतून आत बघत होतो.
इथे एरवी रोज माझा मुक्त संचार असतो. मनात आलं की आतबाहेर करू शकतो मी. पण त्यादिवशी मला आत प्रवेश नव्हता कारण माझ्याकडे Access नव्हता. मनाच्या Access Cardsचंसुद्धा असंच ! एरवी त्याच्याकडे universal access card असतं. पण कधीकधी कुठेतरी माशी शिंकते आणि अचानक कुठल्यातरी खोलीत प्रवेश निषिद्ध होतो. Access blocked !!! खरंतर माशी नाही माणसं शिंकलेली असतात. भांडण म्हणा किंवा परिस्थिती उद्भवते म्हणा काहीतरी होतं आणि आपलं access card हरवतं. मनाची कवाडं बंद होतात. मग मी केलं तसं बाहेरूनच आत डोकवावं लागतं. आतली लगबग बाहेरूनच तटस्थपणे बघावी लागते. इच्छा असूनही समोरच्यानेच कवाडं बंद केल्यावर कुठून मिळणार Access ? अशावेळी जिवाची तगमग होते जळाविना तडफडणाऱ्या माशासारखी किंवा तहानलेल्या वाटसरूसारखी. पण शेवटी ते मृगजळच... काहीही हाती लागत नाही. शेवटी हाती उरतं ते सगळा घटनाक्रम तटस्थपणे बघत राहणं. बरं तेही कायमचं जमत नाही. तहानेला फारसं तिष्ठत ठेवता येणार ? आपण माणसंच शेवटी षड्रिपूंची गुलाम असलेली. काही काळ तटस्थपणे बघून आपण शेवटी मनाची समजूत घालत खऱ्या पाण्याच्या शोधात निघतो. मग दुसराच कुठलातरी access मिळून जातो आणि आपण रमून जातो तिथेच. कधीकधी दुसरं काहीतरी तसंच मिळून जातं आणि आपण तिथे रमून जातो. अजून चांगले earphones मिळतात आणि या इकडे राहून गेलेल्या earphonesची कमतरता भरून निघते, त्यांची आठवणही रहात नाही. असे दुसरे earphones ज्याला सापडले किंवा प्रयत्नपूर्वक शोधले ती व्यक्ती भाग्यवान ! तिचं आयुष्य पुढे सरकतं. पण काहीजण हट्टी असतात. त्यांना तेच earphones हवे असतात आत विसरलेले. ते मग जुन्याच दरवाजाशी उभे राहतात. किंवा काहीजण दुर्दैवी असतात. त्यांना ना या दरवाजाचा access मिळत ना अजून कुठल्या दरवाज्याचा. शेवटी तेही याच दरवाज्यापाशी घुटमळत राहतात कायम. मला access देणारं कोणीतरी सुदैवाने आलं ऑफिसात, पण प्रत्येकाच्या नशिबी हे नसतं. प्रत्येक कुसुम मनोहर लेलेला सदा देशमुख नामक saviour भेटतोच असं नाही.
मग अशावेळी उरतं काय ? दुसरे earphones शोधायचे प्रयत्न चालू ठेवायचे जेणेकरून निवांतपणे गाणी ऐकता येतील, किंवा आतापर्यंत ऐकलेल्या गाण्यांवर समाधान मानून मनाचा access block कायमचा करून आयुष्यभरासाठी गाणी ऐकणंच बंद करायचं, किंवा loudspeakerवर जगाची पर्वा न करता आपली गाणी ऐकायची.
याहून एक बरा पर्याय म्हणजे आपलं जीवनगाणं आपणच गायचं.
"मी हजार चिंतांनी डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो".
या पर्यायाने आपले आयुष्याचे Working Hours संपल्यानंतर म्हणता येईल,
"आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे
माझे जगणे होते गाणे....."
यातून आपल्याला जमेल/रुचेल असा पर्याय प्रत्येकाने निवडायचा आहे. शेवटी निवड ज्याची त्याची आहे. पण आयुष्याच्या शेवटी Spiderman 2 (2002) सिनेमातल्या खलनायक Dr. Octavious सारखं आयुष्याच्या शेवटच्या क्षणी "I won't die a monster" हे realisation नको असेल तर वरीलपैकी शेवटचा पर्याय निवडून आपलंच गाणं आपल्याच मस्तीत शिट्ट्या मारत जगलेलं केव्हाही चांगलंच !! :)
-कौस्तुभ

Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Code मंत्र' - Review

'Suits' that suits well...