Perfection चा अट्टाहास कशासाठी?

परवा अगदी सहज पाऊस बघत gallery त उभी होते. पाऊस नुसता अंगात आल्या सारखा कोसळत होता, कधी सरळ तर कधी वेडावाकडा. तो मनसोक्त बरसत होता, अगदी त्याला हवा तसा. उन्मुक्त.

त्या पावसाला असं पडताना बघून एक क्षण मला त्याचा हेवा वाटला. त्या पावसाच्या कोसळण्यात कुठेही perfection नव्हतं, पण तरीही त्याचं असं वेडंवाकडं कोसळणं बघूनही मला आनंद होत होता.
हे सगळं बघत असतानाच मनात विचार आला, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी perfection चा अट्टाहास का?
आपल्याला लहानपणापासून सांगितलं rather शिकवलं जातं 'तू आयुष्यात कुठलीही गोष्ट कर, पण ती perfectly कर' तू जे काही करशील ते सर्वोत्तमच असायला हवं, पण ह्या perfection च्या नादात आपण जगण्यातला, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हरवून बसतो.
आपल्या ह्या छोटयाशा आयुष्यातील गणितं सोडवताना ती अगदी काटेकोरपणे आणि बिनचूक सोडवण्याचा आपण सगळेच मनापासून प्रयत्न करत असतो, पण खरं सांगायचं तर आपल्या या इतक्या छान आयुष्यात जर सगळंच अगदी perfect साचातलं मिळालं तर त्याचा काय उपयोग? कारण... दुःख सहन करण्याची ताकद, दुःखानंतर आलेल्या सुखामुळे झालेला आनंद, अपयश पचवून पुन्हा यश मिळविण्यासाठी जिद्दीने केलेली धडपड, दुसऱ्याच्या दुःखाने डोळ्यांत आलेलं पाणी, एखाद्या सुंदर फुलाला किंवा छोट्या निरागस बाळाला बघून आपल्याही नकळत आपल्या चेहेऱ्यावर आलेलं हसू या सगळ्या वरवर अगदी छोट्या दिसणाऱ्या गोष्टी perfection च्या नादात जर आयुष्याच्या गणितातून वजा झाल्या तर आनंदानी सोडवावं असं त्या आयुष्याच्या गणितात काही उरणारच नाही, म्हणूनच सगळंच perfect असावं अशी गरज असणाऱ्या या यांत्रिक काळातही काही गणितं चुकण्यातच खरी मजा आहे. चुकणं आणि त्या चुकीतून काहीतरी नवीन शिकणं यातून मिळणारा आनंद लाखमोलाचा असतो.
मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीत perfection चा ध्यास नक्कीच असावा पण अट्टाहास नसावा, perfection मधला आनंद शोधतानाच imperfect असण्यातली गंमतही अनुभवता यायला हवी. म्हणूनच कधीतरी चुकायला हवं, खेळताना धडपडायला हवं, पावसात चिंब भिजायला हवं, पावसासारखच उत्फुल्लपणे जगायला हवं या सगळ्या imperfect गोष्टींमधूनच perfect आयुष्याची किल्ली सापडेल, आणि मुळातच सुंदर असलेलं आयुष्य सुखी आणि जास्त आनंदी होईल. म्हणूनच मला असं म्हणावसं वाटतं की "My life is not perfect, it's HAPPY..!!" :)

-प्रांजली 
३१ जुलै, २०१५. 

Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Code मंत्र' - Review

'Suits' that suits well...