अमित-आभ



अमिताभ... हा ७६ वर्षांचा असला तरी त्याला 'अहो-जाहो' करवत नाही. माझ्यापेक्षा ४८ वर्षांनी मोठा असला तरी 'तो अमिताभ'च आहे. तर... अमिताभचा कुठल्याशा शूटिंगच्या वेळचा एक व्हिडिओ पाहिला. ७६व्या वर्षी तो ज्या उत्साहाने, चपळाईने काम करतोय, विशीत किंवा तिशीत असल्यासारखी इकडून तिकडे धावाधाव करतोय ते पाहताना मनोमन या माणसाला सलाम केला. आयुष्यात त्याने नाव कमावलंच पण साठीच्या उंबरठ्यावर असताना राखेतून फिनिक्सभरारी घेत ज्या यशस्वीपणाने सेकंड इनिंग खेळायला सुरुवात केली (आणि अजूनही खेळतोय) ते पाहताना अमिताभपुढे नतमस्तकच व्हावंसं वाटतं.
त्या व्हिडिओत मेकअपवाल्याने कसलासा फवारा मारल्यामुळे (बहुधा) त्याला अचानक दम लागला. पण त्याने पंप घेतला आणि चालू शूटिंग थांबवलं नाही.
आम्ही विशी आणि तिशीतल्या अनेकांना जरा काम केलं की कंटाळा येतो, थकायला, बोअर वगैरे होतं. हा माणूस शहात्तराव्या अशी धावाधाव करतो ! आम्हाला ९-६ वेळ ऑफिसात गेला की अख्खा दिवस संपल्यासारखं वाटतं आणि हा माणूस रात्री २-२ ३-३ वाजता शूटिंगहून परत आल्यावर पोस्ट टाकतो. आणि परत सकाळी कामाला पुन्हा हजर असतो.
अरे माणसा, किस मिट्टी के बने हो तुम ? कुठून येते एवढी एनर्जी, उत्साह ? तुझे समकालीन कलाकार बघ, एखाद फिल्म करतात केव्हातरी नाहीतर रिटायर झालेत आणि तू ... परवा वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट केलंस त्यात लिहिलंयस-
"The day an artist feels that this is enough no more, would be for me, a defeat on my creative abilities. Yes there shall always be limitations to our abilities, but to admit that without effort, would be devastating. I believe we learn each day of our living life. Giving up on it would mean, giving up on living. I would wish to keep learning each day of my life ; and I do know and realise that even that would never be enough."
तुझ्या १०% ऊर्जा दे आम्हाला, ठरवूनही निव्वळ आळसामुळेन न केलेली कामं तरी मार्गी लागतील ! तुम्ही ऑक्टोबरमध्ये जन्म घेतलेले असेच सतत कामाच्या उत्साहाने सळसळत असता का रे (दुसरं उदाहरण आई माझी , तिसरा आमचा सुमंत म्हणजे सुम्या... म्हणून म्हटलं) ?
त्या व्हिडिओवर कमेंट्समध्ये काही महाभागांनी आपली कोती मनोवृत्ती दाखवत "पैसे मिळतात त्याला" लिहिलंय त्यांची खरंच कीव करावीशी वाटली. पण जाऊदे, ते तुझ्या पासंगालाही पुरणार नाहीत ! तू असाच उत्साहाने पुढची अनेक वर्ष काम करत रहा आणि अशीच मस्त बॅटिंग करून आम्हाला आनंद देत रहा ! तुझ्यासारखे प्रेरणास्रोत फार दुर्मिळ असतात रे...
तुझ्या वाढदिवशी खरं म्हणजे काहीतरी छान लिहायचं होतं तुझ्याबद्दल, पण एकतर वेळ झाला नाही आणि दुसरं म्हणजे तुझे सिनेमे, तुझी एकूण कारकीर्द, तुझी अभिनय क्षमता याबद्दल अनेकांनी लिहिलंय. म्हटलं आता मला तुझ्या भावणाऱ्या वेगळ्या पैलूबद्दल आपण लिहूया...

Love you अमिताभ... ❤️
तुझ्यापेक्षा जवळजवळ अर्धशतकाने लहान तुझा एक चाहता,

कौस्तुभ
१३ ऑक्टोबर २०१८ 


Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Code मंत्र' - Review

'Suits' that suits well...